Sunday 22 June 2008

आण्विक सहकार्य गरजेचे

आण्विक सहकार्य गरजेचे

संयुक्त अमेरीकन राष्ट्रा बरोबर होणाऱ्या अणुकरारामुळे भारतीय संघराज्याला फायदाच होणार आहे. या करारानंतर भारतात नवीन अणुभट्टया उभ्या राहतील. अणुउर्जा निर्मितीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होईल. भारत उर्जा निर्मितीत सक्षम होईल. भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध मजबूत होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अणुकरारामुळे भारत नव्याने उदयास येत असलेल्या चिनी महाशक्तीशी सामना करु शकेल.

या कराराला होणारा विरोध अनाकलनिय आहे. केवळ विरोधासाठी विरोध देशाच्या हितास घातक ठरेल. काही लोकांचा विरोध हा केवळ हा करार अमेरिकेबरोबर होत आहे म्हणून आहे. गंमत म्हणजे शेजारी राष्ट्र चीनने यापुर्वीच असाच एक करार अमेरिकेसोबत केला आहे. त्या कराराला त्यांच्या देशात कोणताच विरोध झाला नव्हता.

करारासंबंधित प्रश्नांवर गेल्या जुलै महिन्यात भारत-अमेरिका व्दिपक्षीय चर्चा झाली होती. या चर्चेनंतर काही गोष्टी स्पष्ट झाल्या. नागरी अणुभट्ट्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा प्राधिकरणाच्या (आयएईए) निरीक्षणाखाली असतानाही इंधनावर फेरप्रक्रिया करण्याची मुभा भारताला देण्यात आली आहे. समजा भारताने आण्विक चाचणी घेतलीच तरी अणुकरार संपुष्टात आणण्याऐवजी द्विपक्षीय चर्चा करण्याची तरतूद करण्यात आली. म्हणजेच भारत आत्मसंरक्षणाचे कारण देवून अणुचाचणी करु शकतो आणि या अणुचाचणीनंतर अमेरिका चर्चेस बंधनकारक राहील.

प्रश्न आहे स्व्यंपूर्णतेचा तर ते शक्य वाटत नाही त्याला प्रमुख कारण म्हणजे थेरीयम असो वा युरेनियम दोन्ही बाबतीत आपण आयातीवर अव्लंबून राहणार आहोत.अणुकरार न झाल्यास भारताला युरेनियम आयात करणे शक्‍य होणार नाही. नियोजन आयोगाचे सदस्य किरीट पारिख यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार भारताला २०३० पर्यंत दोन अब्ज टन कच्चे तेल आणि दहा लाख मेगावॉट विजेची आवश्‍यकता भासेल. अणुकरार न झाल्यास २०३० पर्यंत फक्त ४८ हजार मेगावॉट वीजच निर्माण करता येईल.

आपल्या या अणुकराराला रशियानेही पाठींबा दिला आहे. रशियाच्या मते हा अणुकरार भारतासाठी उपयुक्त असून करारानंतर रशिया अधिक उघडपणे भारताची मदत करु शकेल. रशिया आंतरराष्ट्रीय नियमांनी बांधला गेला आहे जर हा करार झाला तर भारताला मदत पुरवणे सोपे होईल.

असाही एक प्रश्न उपस्थित केला जातो की अमेरिका स्वतःच्या फायद्यासाठी तर हा करार करत नाही ना? जगातला कोणताही देश फायद्याशिवाय करार करत नाही. या करारात जसा भारताचा फायदा आहे तसा अमेरिकेचाही फायदा आहे. पहिला फायद म्हणजे या करारानंतर ज्या अणुभट्टया उभ्या राहतील त्याची कंत्राट अमेरिकन कंपन्यांना मिळतील. दुसरा फायदा असा की नव्याने महासत्ता म्हणून उदयास येणाऱ्या चीनवर भारताच्या मदतीने अंकुश ठेवणे सोपे होईल. हा करार होणे आपल्या शत्रु राष्ट्रांना अजिबात आवडणार नाही. त्यामुळे हा करार लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी देशांतर्गत विरोध मिटवणे गरजेचे आहे.

फिडेल कॅस्ट्रोची निवृत्ती

क्युबा कॉम्युनिस्ट क्रांतीचे जनक आणि क्युबाचे सर्वेसर्वा फिडेल कॅस्ट्रो यांनी आज आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. तत्पुर्वी जुलै २००६ मध्ये त्यांनी राज्यकारभार तात्पुरता भावाकडे सोपवला होता. परंतु आज बी.बी.सी. च्या बातमी नुसार ते कायमचे पाय उतार झाले.


प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना हा निर्णय घेणे भाग पडले. एक सामर्थ्यशाली नेता अशी त्यांची ओळख आहे. १९५९ च्या क्युबन कॉम्युनिस्ट क्रांती पासून त्यांचा क्युबावर एकछत्री अंमल राहीला हे विशेष. गेले १८ महिने ते राज्यकाराभारापासून दुर होते.

Saturday 21 June 2008

राजकारण

राजकारणाला अनेक रंग आहेत, अनेक रुपे आहेत. राजकारण हे काही सामान्य माणसाचे काम नाही. आपल्या भारतात तर राजकारणाला मोठी पंरंपरा आहे. महाभारत असो किंवा चाणाक्यनिती राजकारण सर्वत्र आहे. राजकारण बुध्दीबळाच्या पटासारखे असते. विरोधकाचे नामोहरण करण्यासाठी आपलीच प्यादी वापरली जातात. हे राजकारणी फार कसलेले खेळाडू असतात. कोणत्यावेळी कोणती चाल खेळायची आणि डाव कसा उलटवायचा हे ह्यांनाच माहिती. जेवढा व्यक्ती हुशार तेवढा त्याचा खेळ परफेक्ट. विरोधी प्यादीला बरोबर कोंडीत पकडून त्याची स्वप्ने उधळली जातात.

अशाच चाली सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खेळल्या जात आहेत. या चालींनी कदाचीत शक्तीशाली विरोधक आणि मुख्य स्पर्धक कमजोर होइल पण त्याचबरोबर पक्ष कमजोर होइल आणि त्याचा थेट फायदा इतर पक्षांना होइल.

Thursday 19 June 2008

राष्ट्रवाद

राष्ट्रवाद

गेल्या आठवडयात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळया घटनात पत्रकारांवर हल्ले झाले. केतकरांच्या घरावरील हल्ला, सामना कार्यालयांची तोडफोड, सकाळ वृत्तपत्राच्या पत्रकाराला काळे फासणे ह्या सगळ्या निषेधार्ह घटना आहेत. लोकशाहीतील चौथ्या स्तंभावरील हे हल्ले हिंसक मनोवृत्तीचे दर्शन घडवितात. कोणत्याही विचारांना उत्तर हे विचारांनी देता येते. लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार काही लोकांना पहावत नाही. कोणत्याही गोष्टीला विरोध करण्यासाठी सनदशीर मार्ग उपलब्ध आहेत. त्यांचा वापर होणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी हिंसा करुन काय मिळणार आहे? काहीवेळा तर आंदोलनातील हिंसेमुळे राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान होते. त्यावेळी या आंदोलकांचा राष्ट्रवाद कोठे जातो कोण जाणे? स्वतःच्या हातांनी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करताना यांना काहीच वाटत नाही का?

आपल्यातला राष्ट्रवाद संपत चालला आहे असे मला वाटते. याची कारणे अनेक आहेत. भ्रष्टाचार हे सर्वात मोठे कारण आहे. भ्रष्टाचार आणि पैशाची भूक ही आपल्या व्यवस्थेला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. ह्या पैशाच्या भूकेमुळे अनेक देशद्रोही तयार होतात. दहशतवादी येथे घुसखोरी करतात आणि आपल्या योजना यशस्वी करतात, त्या काय भारतीयांच्या मदतीशिवाय? हे स्वकिय शत्रु कोणत्याही धर्माचे असु शकतात. त्यांचा मतलब फक्त पैशांशी असतो. ज्या भारतात अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पैसे मोजावे लागतात त्या भारतात अशा कारवाया करणे सोपेच आहे. शत्रु राष्ट्रांना दोष देवूयाच पण त्याचबरोबर स्वतःच्या दोषांचे काय ह्याचाही विचार झाला पाहिजे. भ्रष्टाचारी माणसे आपल्या भ्रष्टाचाराची अनेक कारणे देतात. या भ्रष्टाचाराच्या पैश्यातून शिक्षण घेणाऱ्या मुलांवर काय संस्कार होणार? माझ्यामते भ्रष्टाचार हा राष्ट्रद्रोहच आहे.

परकियांच्या दहशतवादाबरोबरच आता स्वकियांचाही दहशतवाद सुरु झाला आहे. काही लोक व्देषाचे विष पाजून देशाचा सर्वनाश करत आहेत. स्वतःच्या माणसांचे जीव घेण्यासाठी बॉम्ब तयार करायचे काम सुरु झाले आहे. हे वेळीच थांबवले नाही तर आपल्या देशाची स्थिती जाती, वंश आणि धर्मांच्या युध्दांनी रसातळाला गेलेल्या आफ्रिकन देशांसारखी होइल. भारत एके काळी विश्वगुरु म्हणून गौरवला गेला होता. तीच स्थिती पुन्हा आणायची असेल तर राष्ट्रवाद जागृत करावा लागेल.

काही लोक राष्ट्रवाद या संकल्पनेचा चुकीचा अर्थ घेतात. हे राष्ट्रवाद वगैरे आपल्याला काही जमणार नाही असे बऱ्याच जणांचे विचार असतात. सर्वसामान्य माणूस काय करु शकतो असेही प्रश्न उठतात. काही सोप्या गोष्टी सांगतो ज्या आपण करु शकतो. प्रथम तुम्हाला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराच योग्य वापर करा. आपण मतदानच करत नसाल तर देशाला चांगले नेतृत्त्व कसे मिळेल? स्वतःच्या परीसराची स्वच्छता ठेवा. तुमच्या घरीभाडेकरु ठेवताना त्याची कागदपत्रे तपासून पहा. शेजारीपाजारी काही संशयास्पद वाटल्यास त्याची खबर योग्यत्या अधिकाऱ्यांना द्या. माहितीच्या अधिकाराचा वापर करा.

आपण आपल्या संस्कृतीत देशाला,भूमीला माता मानतो. या मातेची खरी सेवा करायची असेल तर देशाशी प्रामाणिक राहा. तीच खरी देशसेवा होइल.

Thursday 12 June 2008

माझे ब्लॉगींग .....

माझे ब्लॉगींग .....

तो सन २००७ डिसेंबर महिन्यातला शेवटचा आठवडा होता. मी नेहमीप्रमाणे इंटरनेटच्या मोहजालातून फेरफटका मारत होतो. सहज माझी नजर ब्लॉगवाणी या संकेतस्थळावर गेली. यापूर्वीही मी ब्लॉग्जबद्दल बरेच काही ऐकले होते पण ब्लॉग बनवण्याची इच्छा झाली नव्हती. मी माझ्या संकेतस्थळांच्या दुनियेतच खूश होतो. पण त्या दिवशी मला हरेकृष्णाजी हा ब्लॉग सापडला. ब्लॉग पाहून असे वाटले की मराठीत सर्वसमावेशक ब्लॉग आहेत. ते संख्येने कमी असले तरी आहेत. आपणही एखादा सर्वसमावेशक ब्लॉग तयार करावा, ज्यावर आपले विचार मांडता येतील. मराठी ब्लॉग म्हणजे कविता आणि कथा असेच मला वाटत होते पण काही ब्लॉग पाहून माझे विचार बदलून गेले.

या गोष्टीला आज पाच महिने पूर्ण होत आहेत. माझी दिनचर्या पूर्ण बदलली आहे. सकाळच्या चहाबरोबर आता ब्लॉगवाणी किंवा मराठीब्लॉग्ज डॉट नेट लागतो.

कोणी काय लिहीलयं याची उत्सुकता.

खट्टा मिठा मध्ये आज कुठला इतिहास दिला आहे?

प्राजक्ताने आज कोणत्या पाककलेबद्दल लिहीले आहे?

आज मोरपीसमध्ये नविन काय आहे?

आज महाभारतातील कोणती कथा वाचायला मिळणार?

यासगळयाचीच उत्सुकता. माझे जिवन ब्लॉगमय झाले आहे. दिवसातून तास मी इतरांचे ब्लॉग वाचतो. वाचनातून बरेच काही शिकता येते. गंभीर ,मनोरंजक, हलकेफुलके, राजकारण, क्रिडा, चित्रपट, आरोग्यविषयक, पाककला काय नाही ब्लॉग्जच्या दुनियेत ते सांगा? कंटाळा आला की हास्यमेव जयते आहेच मनोरंजनासाठी. अगदी ऑनलाइन कादंबरीही वाचता येते. केवळ कॉपी-पेस्ट ब्लॉगही आहेत पण ते कधीच लोकप्रिय होवू शकणार नाही. शेवटी नवनिर्माण आणि कल्पकताच तग धरते हे लक्षात असू द्या.

मित्रांनो आपल्या ब्लॉगींगचा धसका बऱ्याच जणांनी घेतला आहे. जास्तीत जास्त ब्लॉगर्स हे पक्षनिरपेक्ष लेखन करतात (अपवाद काही ब्लॉगर्सचा जे तळी उचलून लिखाण करतात.) आणि त्यामुळे सत्य परिस्थिती समोर येते. त्यामुळे बऱ्याच जणांचे धाबे दणाणले. रस्ताचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम असो किंवा नेत्यांची होर्डींग्ज असोत ब्लॉगर्स नेहमीच हे प्रश्न मांडतात. पण काही प्रमाणात आपल्यालाही स्वतः ठरवलेली आचारसंहिता पाळणे गरजेचे ठरते. धर्मांध ब्लॉग्ज तुम्ही पहातच असाल. अत्यंत स्फोटक आणि चिथावणीखोर विचार या ब्लॉग्जमध्ये आहेत. भारतीय संघराज्याच्या ,भारतीय ध्वजाच्या, भारतीय राष्ट्रगीताच्या आणि अस्मितेच्या विरोधात लिहीणे हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे.

जेवण म्हणजे मराठी माणसाचा विक पॉईंट. रोजरोज नवनविन पाककला शिकवणाऱ्या प्राजक्ता आणि रुचिरा यांचे ब्लॉग कधी सोबती बनले कळलेच नाही. चकलीनेही बरच काही शिकवलं. गेला पूर्ण आठवडा या ब्लॉग्जच्या दुनियेपासून दूर होतो पण प्रत्येक क्षणाला आपल्या सर्वांची आठवण येत होती. कधी एकदा परीक्षा संपते याचीच वाट बघत होतो. प्रतिक्षा संपली. लिखाण सुरु.......

- वामन परुळेकर

Technorati Profile

Monday 2 June 2008

विश्वासाची माती ???

गेला आठवडाभर टी.व्ही. मिडीया आणि संकेतस्थळांवर एक बातमी मोठया प्रमाणात चर्चेत होती. ही बातमी म्हणजे कोल्हापूरच्या एका युवकाने केलेली फसवणूक. आपली निवड नासात झाल्याचा दावा या युवकाने केला होता. गंमत म्हणजे देशातील काही टी.व्ही. वाहिन्यांनी या निवड बातमीचे डोळे झाकून प्रक्षेपण केले होते. त्यावेळी बातमीचा सत्यपणा पडताळण्याची गरज कुठल्याही वाहिनीला वाटली नव्हती. सर्वांनी डोळे झाकून बातमी दिली होती. मिडियावर विश्वास ठेवणे योग्य होइल का? हा विचार मी करतोय. एका युवकाने मिडियाला लिलया फसवले तर मग न्य बातम्यांवर तरी विश्वास कसा ठेवायचा?

राज ठाकरेंचे आंदोलन असो किंवा कांबळेची निवड, लोकांचा टी.व्ही.मिडियावरचा विश्वास उडत चालला आहे. बातमी द्यायची घाई एवढी की शहानिशा करायलाच वेळ नाही. नव्या नव्या चौविस तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या, त्यांच्यातील भयानक स्पर्धा, या सगळ्यात दर्जेदार बातम्या द्यायला वेळ कोणाला आहे. मित्रांनो या वाहिन्यांच्या बातम्यांवर किती विश्वास ठेवायचा हे प्रत्येकाच्या वैयक्तिक मतांवर अवलंबून आहे. पण दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या वाहिन्यांच्या दर्जावर विचार व्हायलाच हवा. जेव्हा तासनतास नट नटयांच्या बातम्या दाखवताना प्रेक्षकांना हेच आवडते म्हणून आम्ही दाखवतो ही पुस्ती जोडली जाते तेव्हा जरुर विचार व्हायलाच हवा.

पण हा टी.आर्.पी. तरी खरा आहे का? लोकसभेत मंत्र्यांनीही टी.आर्.पी.बद्दल संशय व्यक्त केला होता. त्यांचा आवाज दाबण्याचाही प्रयत्न झाला होता. लोकशाहीसाठी हा एक भयानक प्रकार आहे. मिडिया अभिव्यक्तीच्या नावाखाली दबावतंत्र वापरणे घातकच आहे. सिंधुमहोत्सवावेळी काही वाहिन्यांचे खरे स्वरुप उघडे झाले होते. त्यावेळी कठोर टीका झाली होती. या वाहिन्यांमध्ये काही वाहिन्यांनी आपला दर्जा मात्र टिकवून ठेवला आहे. ह्या वाहिन्यांना लोकाश्रय मिळणे गरजेचे आहे. शक्य आहे की माझ्या मतांशी आपण सहमत नसाल . आपल्या मतांची जरुर नोंद करा.


ShareThis

Registered With