Saturday 28 November 2009

फयान नंतर


फयानने दक्षिण कोकणात धुमशाण घातले. काही भागात दोन आठवडे वीज नव्हती. तर काही भागात अजुन वीज नाही आहे. मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. जिवीतहानी मोठया प्रमाणावर झाली. पण आश्चर्य म्हणजे सरकारने योग्य मदत पुरवली नाही.अजुनही अनेक मच्छीमार बेपत्ता आहेत. त्यांचे मृतदेहही सापडले नाहीत. सुरवातीला तर सरकारी यंत्रणेने हे मृतदेह उचलण्यास नकार दिला होता. केवळ जिवंत मच्छीमार मिळाले तरच त्यांना बोटीत घेवु अशी भुमिका संवेदनाशुन्य सरकारी यंत्रणेने घेतली होती मात्र नंतर मिडीयाने आवाज उठवताच ही भुमिका बदलली. या विषयावरुन हायकोर्टानेही सरकारला फटकार लगावली आहे. पण अजुनही सरकार जागे झाले असे वाटत नाही.

अजुनही अनेक मच्छिमार घरी परतलेले नाहीत. उदाहरणच द्यायचे तर दिनांक २८ नोव्हेंबर म्हणजे आजच्याच लोकमत मध्ये प्रकाशीत बातमीनुसार दापोली येथील शिरगावकर कुटुंबाला कोणतीही मदत मिळालेली नही. केवळ मृतदेह न सापडल्यामुळे त्यांना मदत नाकारण्यात आली. शिरगावकर कुटुंबातील दोघे भाउ व एक भाचा बेपत्ता आहेत. या तिघांचेही निधन झाले असण्याची शक्यता आहे. त्यांचे मृतदेह शोधण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. यात शिरगावकर कुटुंबियांचा कोणताही दोष नाही परंतु तरीही ते केवळ सरकारी नियमांमुळे मदतीपासुन वंचित आहेत. अजुनही रत्नागिरी जिल्ह्यात ३० खलाशी बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही मदत पोहचलेली नाही. काही मच्छिमारांच्या जाळ्यांचे,बोटींचे आणि घरांचेही नुकसान झाले आहे. येथेही मोठा विनोद पहा, येथिल एका मच्छिमारी संस्थेला २५ नोव्हेंबर पर्यंत जाळी खरेदीच्या पावत्या सादर करा असे पत्र आले तेही २५ नोव्हेंबरलाच. एवढ्या कमी वेळात सर्व मच्छीमारांना ही बातमी मिळणे शक्य आहे का? मच्छिमारांनी जर पावत्या जपुन ठेवल्या नसतील तर त्यांना कधीच मदत मिळणार नाही का? आणि ज्यांच्या पावत्या आणि बोटींची कागदपत्रे वाहून गेलीत त्यांचे काय? ते मदतीस पात्र नाहीत का?? मच्छिमार बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळणे गरजेचे आहे.

Tuesday 7 April 2009

भारनियमन कधी बंद होणार??

भारनियमन कधी बंद होणार??

लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार चालू आहे. प्रत्येक पक्ष वारेमाप आश्वासने देत आहे. 2 रुपयात गहु काय आणि राम मंदिर काय आश्वासनांची कमी नाही . पण सर्वात मह्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजेच विजेच्या मुद्द्यावर नेते स्पष्ट बोलत नाहीत. गेल्या 5 वर्षात वीजेचा प्रश्न सुटावा यासाठी आपल्या उमेदवाराने कोणते प्रयत्न केले ? विजेचा प्रश्न सुटावा यासाठी कोणते प्रयत्न तो करणार आहे हे जाणुन घेतले पाहिजे. कडाक्याच्या उन्हाळ्यात जेव्हा दुपारी 3 तास वीज जाते तेव्हा कळते की वीजेचा प्रश्न किती गंभीर आहे. जनरेटरचा वापर करणाऱ्या आणि वातानुकुलीत खोलीत बसणाऱ्यांना ह्या प्रश्नाची गंभीरता कळणार नाही. सर्व पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात या प्रश्नावर तरतुदी सुचवाव्यात आणि हा प्रश्न कायम स्वरुपी सोडवण्याचा प्रयत्न करावा एवढीच सामान्यांची अपेक्षा आहे.

Monday 30 March 2009

विकास हाच प्रमुख मुद्दा असावा.

विकासाचाच मुद्दा हवा.

गेल्या अनेक निवडणुकात या देशात अनेक प्रयोग झाले. गरीबी हटाव,शीख दंगलीच भांडवल,बोफोर्स,राम मंदीर,इंडीया शायनिंग अशा अनेक मुद्द्यांवर निवडणुका झाल्या. कधी कांद्याने कोणाला रडवले तर कधी तोफेने. येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भावनिक मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. धर्माधर्मात फूट पाडण्याचे प्रयत्न चालु झाले आहेत. हे सर्व कुटील डाव वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

उमेदवार निवडताना त्याची जात,धर्म कोणता हे पहाण्यापेक्षा त्याने कोणती विकासाची कामे केली आहेत ते पहाणे जरुरीचे आहे. उमेदवाराच्या भावी योजना काय आहेत? तो सर्वसामान्यांमध्ये मिसळू शकतो का? उमेदवार भ्रष्टाचारी तर नाही ना? देशस्तरावरील प्रश्नांची त्याला जाण आहे का? उमेदवार नवीन असेल तर यापुर्वी काम केलेल्या क्षेत्रातील त्याचे कार्य कसे होते हे जरुर तपासुन पहावे.

ShareThis

Registered With