गावडेश्वर मंदिर – माझ्या बालपणाच्या अविस्मरणीय आठवणी
वेंगुर्ल्यातील गावडेश्वर मंदिर आणि त्याचा परिसर माझ्या बालपणाच्या असंख्य आठवणींनी भरलेला आहे. हे मंदिर माझ्यासाठी केवळ धार्मिक स्थळ नसून माझ्या आयुष्यातील सुंदर क्षणांचा, निरागस मैत्रीचा आणि आनंदी बालपणाचा जिवंत ठेवा आहे.
मंदिराच्या छोट्याशा आवारात एक पारिजाताचे झाड होते. लहानपणी आम्ही त्या झाडावर चढायचो आणि मग घरच्यांचा ओरडा ठरलेलाच असायचा. समोरच्या घरात आमच्या मानलेल्या मावश्या राहत होत्या. त्यांनी आम्हाला झाडावर पाहिले की तक्रार थेट घरी पोहोचायची! तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा झाडावर चढण्याचा मोह काही आवरत नसे.
मंदिराच्या परिसरात मित्रांसोबत "खांब-खांब", "डोंगर-पाणी" आणि असे अनेक खेळ खेळत आम्ही मोठे झालो. शाळेनंतर संध्याकाळी सगळे मित्र मंदिराजवळ जमायचो आणि खेळण्यात वेळ कसा जायचा ते कळायचेही नाही. काही मित्रांसोबत अभ्यासाच्या आठवणीही याच परिसराशी जोडलेल्या आहेत. माझा अनेक मित्र मंदिराच्या जवळपास राहत होते, तर आमचे काही नातेवाईकही मंदिराजवळ राहत असल्याने त्या भागात आमचा सतत वावर असायचा. त्यांच्या घरी खेळणे, गप्पा मारणे आणि संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र जमणे हा आमच्या बालपणाचा अविभाज्य भाग होता. मुख्य रस्त्यावरून एखादी पालखी, मिरवणूक किंवा धार्मिक सोहळा जात असल्याचे कळले की आम्ही धावत मंदिराकडे पोहोचायचो. त्या काळात मोबाईल नव्हते, सोशल मीडिया नव्हता; पण प्रत्येक दिवसात आनंद, उत्सुकता आणि आपुलकी भरून राहिली होती.
त्या काळी आम्ही अगदी जवळच वाडकर यांच्या घरी भाड्याने राहत होतो. मंदिराच्या बाजूला "म्हादनवाडी" नावाने प्रसिद्ध एक मोठे, जुने आणि पडके घर होते. आम्हा लहान मुलांना तिकडे उगीच जाऊ नये म्हणून माझी आजी जनाबाई यांनी सांगून ठेवले होते की त्या घरात भूत आहे! त्यामुळे त्या घराजवळून जातानाच आमच्या मनात भीती निर्माण व्हायची. तिकडे नजर गेली की आम्ही घाबरतच आणि तो भाग अक्षरशः धावत पार करायचो. आज त्या आठवणी आठवल्या की खूप गंमत वाटते. त्या वेळी खऱ्या वाटणाऱ्या गोष्टी आज बालपणातील निरागसतेची आणि आजीच्या प्रेमळ काळजीची गोड आठवण बनून राहिल्या आहेत.
गावडेश्वर मंदिराची जत्रा म्हणजे आमच्यासाठी वर्षातील सर्वात मोठा उत्सव असायचा. जत्रेचे दिवस जवळ आले की मनात उत्सुकता सुरू व्हायची. घरात पाहुण्यांची ये-जा वाढायची. विशेष जेवण बनायचे, घरात आनंदाचे वातावरण असायचे आणि संपूर्ण परिसर उत्सवमय होऊन जायचा. जत्रेच्या दिवशी नवीन कपडे घालून आम्ही फिरायला जायचो. खेळण्यांची दुकाने, खाऊचे स्टॉल आणि लोकांची गर्दी यामुळे जत्रेची रंगत आणखी वाढायची.
जत्रेतून एखादे खेळणे आणले की ते सर्वात आधी मुक्तानंद दादा आणि दीपा ताईंना दाखवण्याची घाई असायची. त्यांनी कौतुक केले की जत्रेचा आनंद आणखी वाढायचा. त्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये किती मोठा आनंद दडलेला होता, याची जाणीव आज होते.
रात्री उशिरापर्यंत रंगणारे दशावतार नाटक हा जत्रेचा अविभाज्य भाग होता. त्या नाटकातील पात्रे, संवाद, वेशभूषा आणि वातावरण याचे आम्हाला खूप आकर्षण वाटायचे.
आज अनेक वर्षांनंतर त्या आठवणींना उजाळा दिला की मन पुन्हा त्या बालपणात जाऊन पोहोचते. मंदिर, पारिजाताचे झाड, मित्रांचे खेळ, म्हादनवाडीची भीती, जत्रेची धामधूम, दशावताराची रात्र, नातेवाईकांची घरे आणि त्या परिसरातील प्रत्येक कोपरा आजही मनात तितकाच जिवंत आहे.
गावडेश्वर मंदिर हा माझ्यासाठी केवळ श्रद्धेचा विषय नाही; तो माझ्या बालपणाचा, मैत्रीचा, कौटुंबिक प्रेमाचा आणि असंख्य सुंदर आठवणींचा खजिना आहे. आयुष्याच्या प्रवासात कितीही पुढे गेलो तरी या परिसराशी असलेले नाते आणि येथे घालवलेले आनंदाचे क्षण कायम हृदयात जपून ठेवेन.
प्रा. वामन राधाकृष्ण परुळेकर




