Monday, 21 April 2008

२८०८

वर्ष - २८०८

स्थान - महाराष्ट्र इतिहास वाहिनी (अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त),
महाराष्ट्र

भाषा - मराठी असेलच असे सांगता येत नाही पण कल्पना करुया.

नमस्कार आपले स्वागत इतिहास २४ तासवर . आत्ता मिळालेल्या माहितीनुसार आमच्या संशोधकांना २००८ सालातील काही महत्त्वपूर्ण पुरावे हाती लागले आहेत. तत्कालीन माणसे क्रिकेट या खेळाची खूप शौकिन होती असे दिसते. आमच्या संशोधकांना काही वृत्तपत्रांची कात्रणे आणि चित्रफिती मिळाल्या आहेत. त्याचे संशोधन चालू आहे. २१०७ च्या दरम्यान पुराखाली दबल्या गेलेल्या एका मोठया शहरात उत्खननात हे पुरावे सापडले. तत्कालीन पुराव्यानुसार क्रिकेट या खेळातील सर्वात मोठी स्पर्धा भारतदेशी खेळवली जात असे.

सापडलेले पुरावे अर्धवट स्थितीत असल्यामुळे आणि लिपी अवघड असल्यामुळे पूर्ण माहिती मिळालेली नाही. ह्या स्पर्धेचे नाव आय्.पी.एल्. होते. ली नामक एक खेळाडू पंजाब संघाकडून खेळायचा. हा महत्त्वपूर्ण पुरावा आहे. यावरुन स्पष्ट होते की लींचे मूळ पंजाबात असावे. तत्कालीन भारत देश हा प्रचंड श्रीमंत देश असावा कारण एका खेळाडूला करोडो रुपये मानधन दिले जात होते. काही खेळाडूंची नावे आमच्या हाती लागली आहेत. यात ब्रेट ली, सचिन, राहूल आणि शाहरुख खान नामक खेळाडूंचा समावेश आहे. हा शाहरुख खान एका संघाचा मालक असूनही १२ वा खेळाडू होता. त्याच्याकडे खेळाडूंना पाणी देण्याचे काम असावे.

मिळालेल्या पुराव्यानुसार असे सिध्द होते की तत्कालीन कलाकार हे उरलेल्या वेळेत क्रिकेट खेळायचे. तत्कालीन क्रिकेटचे सर्वेसर्वा पवार हे व्यक्ती होते. त्यांनीच ह्या स्पर्धेची सुरुवात केली.

Thursday, 10 April 2008

खासगी राष्ट्रीय वृत्तवाहिन्या ?

खासगी राष्ट्रीय वृत्तवाहिन्या ?

सध्या खासगी वृत्तवाहिन्यांचा सुकाळ आहे. खासगी इंग्रजी,हिंदी वृत्तवाहिन्या २४ तास बातम्या देत आहेत. यातील काही वाहिन्या स्वतःला राष्ट्रीय म्हणवून घेतात. पण ज्या वाहिन्यांवर दिल्ली,यु.पी.,बिहार,मुंबई या मर्यादित क्षेत्रातल्या बातम्या दाखवल्या जातात त्या वाहिन्या राष्ट्रीय कशा? या वाहिन्यांवर इतर राज्यांच्या बातम्यांसाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र, केरळ या राज्यांच्या बातम्या तुलनेत फारच कमी दाखवल्या जातात. काही वाहिन्या तर भारतीय सिनेमा म्हणजे हिंदी सिनेमा असेच समजून चालतात. कन्नड,तमिळ,तेलगू चित्रपट उद्योग फार मोठा उद्योग आहे. या चित्रपटांच्या बातम्यांना या वाहिन्या फारसे महत्त्व देत नाहीत.

मला असे वाटते की जोपर्यंत या वाहिन्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचत नाहीत तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय बातम्या देणाऱ्या वाहिन्या म्हणता येणार नाही. या सर्व खासगी राष्ट्रीय वाहिन्यांनी डी.डी.न्यूज या सरकारी राष्ट्रीय वाहिनीकडून आदर्श घ्यावा. डी.डी.न्यूजवर प्रत्येक राज्याच्या बातम्या प्रसारीत केल्या जातात. स्टेट स्कॅन आणि सीटी स्कॅन न्यूजमध्ये प्रत्येक क्षेत्राला वेळ वाटून दिलेला असतो, त्यावेळेत त्या त्या क्षेत्राच्या बातम्या प्रसारीत केल्या जातात. खासगी वाहिन्यांनीही प्रत्येक क्षेत्राला ठरावीक हक्काची वेळ उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरुन त्या खऱ्या अर्थाने राष्ट्रीय वाहिन्या ठरतील.

Saturday, 5 April 2008

नववर्षाच्या शुभेच्छा

नववर्षाच्या शुभेच्छा

सर्व ब्लॉग वाचक आणि चालकांना नववर्षाच्या शुभेच्छा.

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

ShareThis

Registered With