Monday 21 April 2008

२८०८

वर्ष - २८०८

स्थान - महाराष्ट्र इतिहास वाहिनी (अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त),
महाराष्ट्र

भाषा - मराठी असेलच असे सांगता येत नाही पण कल्पना करुया.

नमस्कार आपले स्वागत इतिहास २४ तासवर . आत्ता मिळालेल्या माहितीनुसार आमच्या संशोधकांना २००८ सालातील काही महत्त्वपूर्ण पुरावे हाती लागले आहेत. तत्कालीन माणसे क्रिकेट या खेळाची खूप शौकिन होती असे दिसते. आमच्या संशोधकांना काही वृत्तपत्रांची कात्रणे आणि चित्रफिती मिळाल्या आहेत. त्याचे संशोधन चालू आहे. २१०७ च्या दरम्यान पुराखाली दबल्या गेलेल्या एका मोठया शहरात उत्खननात हे पुरावे सापडले. तत्कालीन पुराव्यानुसार क्रिकेट या खेळातील सर्वात मोठी स्पर्धा भारतदेशी खेळवली जात असे.

सापडलेले पुरावे अर्धवट स्थितीत असल्यामुळे आणि लिपी अवघड असल्यामुळे पूर्ण माहिती मिळालेली नाही. ह्या स्पर्धेचे नाव आय्.पी.एल्. होते. ली नामक एक खेळाडू पंजाब संघाकडून खेळायचा. हा महत्त्वपूर्ण पुरावा आहे. यावरुन स्पष्ट होते की लींचे मूळ पंजाबात असावे. तत्कालीन भारत देश हा प्रचंड श्रीमंत देश असावा कारण एका खेळाडूला करोडो रुपये मानधन दिले जात होते. काही खेळाडूंची नावे आमच्या हाती लागली आहेत. यात ब्रेट ली, सचिन, राहूल आणि शाहरुख खान नामक खेळाडूंचा समावेश आहे. हा शाहरुख खान एका संघाचा मालक असूनही १२ वा खेळाडू होता. त्याच्याकडे खेळाडूंना पाणी देण्याचे काम असावे.

मिळालेल्या पुराव्यानुसार असे सिध्द होते की तत्कालीन कलाकार हे उरलेल्या वेळेत क्रिकेट खेळायचे. तत्कालीन क्रिकेटचे सर्वेसर्वा पवार हे व्यक्ती होते. त्यांनीच ह्या स्पर्धेची सुरुवात केली.

No comments:

ShareThis

Registered With