पुरातन मंदीरे हे त्या त्या भागातल्या इतिहासाची स्मारकं असतात. कोकणातल्या प्रत्येक मंदिरात मूळपुरुष आणि ज्यांनी ते गाव वसवल त्यांच्या आठवणी प्रीत्यर्थ एक खास जागा राखून ठेवलेली असते. त्याव्यतिरिक्त मंदीरांची अंतर्गत रचना, मूर्तीकला आणि स्थापत्यकला ही माझ्या आकर्षणाची केंद्रे आहेत. ज्या काळात ही मंदिरे बांधली गेली त्याकाळातील स्थापत्यकला बघता येते. मंदिराव्यतिरिक्त इतर कोणतीही ऐतिहासिक वास्तू आपल्याकडे कोकणात एवढी जपून ठेवली जात नाही. साहजिकच त्यामुळे मला मंदिरे फिरायला आवडतात. अर्थात केवळ मंदिरात गेल्यामुळे मी सनातनी होत नाही किंवा मंदिरात जर भेदभावाची वागणूक दिली जात असेल तर त्यालाही माझा पाठींबा मुळीच नाही. मला कोकणातली मंदिरे जेवढी दर्शनीय वाटतात तेवढीच चर्च देखील. तसेच ईश्वर, अल्लाह आणि ख्रिस्त माझ्यालेखी एकच.
आता प्रश्न राहिला माझ्या पूर्वजांचा तर त्यांच्या सनातनी असण्याने माझ्या विचारांवर कोणताही परिणाम होत नाही. मला ज्ञात मोठी उदाहरणे सनातनी नसलेल्या पुर्वजांची आहेत. माझे पूर्वज माझे पणजोबा सुभेदार मेजर विष्णू स. परुळेकर यांनी देवळात कधी पाउल ठेवल नव्हत तशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती. त्यांचा देवावर विश्वास होता पण मंदिरावर नाही. सुधारणावादी आणि पुरोगामी अशी त्यांची ओळख होती. अर्थात त्याला कारण मंदिरात त्याकाळी बहुजनांना दिल्या जाणाऱ्या वागणूकीबद्दल त्यांच्या मनात चीड होती.
निवतीचे किल्लेदार बाळोजी नाईक परुळेकर यांनी समाजसुधारणेची मोहीम हाती घेतली होती. तेही धर्मिक वृत्तीचे होते पण सनातनी मुळीच नव्हते. नंतरच्या काळात सुभेदारांचे नातेवाईक असलेले डॉ. रायसाहेब रामजी खानोलकर यांनी जी समाजसुधारणा केली त्याला तोड नाही. बहुजनांच्या शिक्षणासाठी शाळा, हायस्कूल बांधले. धर्मशाळा बांधली. क्वेटा हिंदू परिषदचे ते अध्यक्ष होते. अनेक अशी कामे केली जी संपूर्ण मानवी समाजाच्या हिताची होती. डॉ. रायसाहेब रामजी खानोलकर हे संस्कृतचे पंडीत होते. रामकृष्ण मिशनचे सदस्य होते. माझे पूर्वज धार्मिक होते पण सनातनी नव्हते. हे सगळ लिहिण्यास कारण की नरेशजी यांच्या मनात जी शंका होती ती दूर करणे. कृपया गैरसमज नको. धन्यवाद..
No comments:
Post a Comment