Monday, 19 December 2011

गोवा मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


गोवा मुक्ती दिनाच्या सर्व गोमंतकीयांना, माझ्या सर्व मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या आणि आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व सीमावासीयांना विनम्र अभिवादन. त्यावेळी स्वातंत्र्यसैनिक कारवार, वेंगुर्ला, बांदा, सावंतवाडी या भागात शरण घेत आणि रात्रीच्यावेळी पोर्तुगीज सैनिकांची नजर चुकवून सीमेवरून पलीकडे जात असत. १५ ऑगस्ट १९५५ ज्यावेळी सिंधुदुर्गात स्वातंत्र्यदिन साजरा होत होता शेजारचा गोवा मात्र पारतंत्रात होता. याचदिवशी ५००० लोकांनी सीमेवरील भागातून गोव्यात घुसून गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पलीकडून अंधाधुंद गोळीबार झाला. अनेकांना प्राण गमवावे लागले. शेकडोंनी जबर जखमी झाले. हा प्रयत्न गोव्याच्या लष्करी शक्तीमुळे अयशस्वी झाला. गोवा सरकारने अजून निर्दयता दाखवत सीमा सील केली. कोणालाही गोव्यात जावू दिल जात नव्हत. अनेकांचे नातेवाईक गोव्यात होते. माहेरवाशिणी दोन्हीकडच्या तिथेच अडकल्या. अनेकांच्या नोकऱ्या गोव्यात होत्या. सर्वकाही ठप्प झालं होत.

गोव्यातील परिस्थिती १९५५ नंतर चिघळत गेली. सशस्त्र आंदोलन सुरू झालं. आझाद गोमंतक दल आणि गोवा लिबरेशन आर्मी यात पुढे होती. अहिंसक आंदोलनेही सुरू होतीच. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच ऑगस्ट १९६१ मध्ये भारतीय फौजा सीमाभागात जमवाजमव करू लागल्या. पुढचे काही महिने सीमेवरील भागात भारतीय फौज तळ ठोकून होती आणि दबाव वाढवत होती. अखेर १7 डिसेंबरला सकाळी ९ वाजून ४५ मी. भारतीय भूदलाने दोन बाजूने म्हणजे सिंधुदुर्गातून आणि कर्नाटकातून हल्ला सुरू केला. ब्रिगेडीयर सगत सिंग यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग आणि डिचोली या लष्करी तळांवर हल्ले सुरू केले. ४५००० ची इन्फंट्री आणि चिलखती रणगाडे धूळ उडवत गोव्यात घुसले. पोर्तुगीजांनी घाबरून स्वतःच अस्नोडा आणि पेडणे येथिल पूल पाडले. १८ डिसेंबरला रात्री दोन वाजता दोडामार्ग ताब्यात घेत भारतीय फौजा उसगाव कडे कुच करू लागल्या. पहाटे चार वाजता डिचोली शहरावर ताब्यासाठी युद्ध सुरू झाले. आर्टिलरी ने जोरदार बॉम्बीग करत डिचोलीजवळील पोर्तुगीज तळावर ताबा मिळविला. तिकडे पहाटे ५ वाजेपर्यंत अस्नोडा ताब्यात आले.

सैन्याच्या विजयाच्या बातम्या येताच सीमाभागात आतिषबाजी सुरू झाली. मिठाई वाटली गेली. दुपारी १२ च्यादरम्यान म्हापसा शहराजवळ सैन्य पोहचले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत भारतीय फौज पर्वरीत पोहचली होती. तिकडे नौदल आणि हवाईदलाच्या संयुक्त कारवाईत मडगाव बंदर ताब्यात घेण्यात आले. हवाई दलाने लढाऊ विमानांचा वापर करत बांबूळी विमानतळावर ६५००० पौंडाचा बॉम्ब वर्षाव केला आणि एका मिनिटात पूर्ण विमानतळ उध्वस्त केलं. एकाचवेळी एवढ्या मोठया हल्याला तोंड देण पोर्तुगीजांना जमल नाही अखेर १९ डिसेंबर म्हणजे अवघ्या दोन दिवसात पोर्तुगीज गोव्याचा पाडव झाला. पराजयाने चिडलेल्या पोर्तुगालने सजत सिंग यांना पकडून देणाऱ्यास युएस डॉलर १०००० च पारितोषिक जाहीर केलं. भारतीय हल्याच्या विरोधात पोर्तुगालमध्ये निदर्शने झाली. सिनेमागृहे आणि हॉटेल्स बंद करण्यात आली. नाताळ न साजरा करण्याचा निर्णय झाला. गोव्यात मात्र आनंदोत्सव सुरू होता. या युद्धात २२ भारतीय सैनिकांना वीरमरण आल आणि ५४ जखमी झाले. २० युद्धनौका आणि ४० लढाऊ विमांनांचा वापर भारतीय फौजेने केला. या लढयात वीरमरण आलेल्या सर्व जवानांना माझे वंदन.... गोय मुक्ती दिनाच्यो सगळ्या गोयकाराक शुभेच्छा...

No comments:

ShareThis

Registered With