Saturday 24 December 2011

अटलबिहारी वाजपेयी

लोकप्रिय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा उद्या जन्मदिन. गांधीच्या भारत छोडो आंदोलनात अटलजीनी तुरुंगवास भोगला. १९५७ मध्ये अटलजी सर्वप्रथम लोकसभेचे सदस्य बनले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी भविष्य वर्तवले होते की हा युवक एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनेल. हे भविष्य सत्यात उतरायला ३९ वर्षे लागली पण नेहरूंच्या नंतर सलग तीन वेळा पंतप्रधान बनण्याचा मान अटलजींनाच मिळाला. अटलजींच व्यक्तिमत्वच वेगळ होत. संकुचित दृष्टीकोन असलेल्या आपल्या पक्षाला त्यांनी विशाल दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न केला. इंदिरा गांधी यांना दुर्गेचा अवतार म्हणून त्यांची पाठराखण करणारे अटलजी आणीबाणीत त्यांचा विरोध करताना सर्वात पुढे होते. आणीबाणीच्या वेळी आपल्या पक्षाचे विलीनीकरण त्यांनी जनता पार्टीत केले. पुढे ही जनता पार्टी काही टिकली नाही. 
 
१९८० मध्ये अटलजींनी भारतीय जनता पक्ष या नावाने पुन्हा एक नवी सुरुवात केली. पण १९८४ च्या निवणुकीत त्यांना पराजयाला सामोरे जावे लागले एके काळी ३० पेक्षा जास्त जागा जिंकणारा पक्ष दोन जागांवर आटोपला. अनेक चढउतार त्यांनी पाहिले. डीपॉझीट जप्त व्हायची पाळी आली पण ते खचले नाहीत. १९९६ च सरकार अल्पकालीन ठरल. २००४ पर्यंत अटलजी भारताचे पंतप्रधान राहिले. अटलजी उदारमतवादी होते. सर्वांना सोबत नेण्याची कला त्यांच्या कडे होती. आघाडी सरकारचा प्रयोग त्यांनीच यशस्वी करून दाखवला. विरोधकही अटलजींचा सन्मान करत परंतु त्यांच्या जवळच्या लोकांनीच त्यांना दगा दिला. सुब्रमण्यम स्वामी, शंकरसिंग वाघेला आणि काही इतर जवळच्या लोकांनीच अटलजींची साथ सोडली. याची खंत अटलजींनी त्यांच्या कवितेतून व्यक्त केली. 
 
एकदा लोकसभेला संबोधीत करताना अटलजी म्हणाले होते की, "मी नेहरूंच्या काळातील लोकसभेचे सुवर्णयुग बघितले आहे. आजच्या नेत्यांचा बोलण्याचा स्तर घसरत चालला आहे." अटलजींनी कायम साफ भाषा ठेवली त्यांनी आपल्या भाषणाचा स्तर कधीही घसरू दिला नाही. अटलजींच सक्षम नेतृत्व होत तोपर्यंत भाजपाचा सुवर्णकाळ होता. देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत बोलताना अटलबिहारी वाजपेयी यांना भारतीय राजकारणाचे भीष्म पितामह म्हटले आहे. अटलजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

1 comment:

निलेश फडके, पुणे said...

अप्रतिम लेख

ShareThis

Registered With